Tuesday, June 6, 2017

नाशिकचा हरिहर गड..

पावसाळी जलयात्रा करून, सह्याद्रीच्या तुडुंब वाहणाऱ्या जलकुंड, धबधबे, झरे, नद्या, डबडबलेले रस्ते, ओशाळलेल्या वातावरणात न्हाऊन घेऊन; मग ग्रीष्म ऋतूच्या उबदार थंडीत खेळून, भरकटून, पायाच्या तळव्या पासून ते टूकटूकनाऱ्या दातापर्यंत होणारी कुडकुड इथपर्यंत केलेला सह्याद्रीचा प्रवास तसा लाखमोलाचा अनुभव आहे, पण माझ्या उराला कुठ अजून शांत बसू वाटतं, अजून ह्याची कुणकुण चालूच असते.... ऐकतयथोडी हे बेंन...!!

बर्याच दिवसापासून... नाही..! नाही..! बर्याच वर्षापासून म्हणाल तरी चालेल.. मनात स्वर्ग म्हणून केलेली जागा म्हणजे #हरिहरगड, बराच प्लान होता मनामध्ये हा गड करण्याचा पण नशिबाची साथ कुठ तरी हरवली होती माझा बाबतीत म्हणून काय ते माझाकडून काही जमलं नाही आणि काय तो मुहूर्त लागला नाहीचं ह्या गडाला कधी जाण्याचा, पण म्हणतात ना “भगवान के घर देर है पर अंधेर नही”... असच काही तरी झालं आणि योग जुळून आला माझा, आमच्या कॉग्नीचा ट्रेक ग्रुपचे ठरले कि जायचे आहे हरीहर गडाला, व्होट्सअपच्या ग्रुपवर चर्चा झाली, वेळ ठरली, सगळ सगळ ठरलं पण येणारी मंडळी तेवढी राहिली..! म्हणजे पारंपारिक रित्या काहींचे यायचे राहिले आणि राहिले आम्ही फ़क़्त दोघच, एड्मीन आणि मी.. पण माझातील आग पेटलेली ती काही अशी सहज विझनार थोडी होती, मग आमच्या दोघांचेच ठरले जायचे, ठरल्या वेळेत, ठरल्या ठिकाणी..स्वप्न नगरीत...

शुक्रवारचे काम आटपून आम्ही निघणार हे ठरले आणि शनिवारी सकाळच्या ठोक्याला कॉल आला “...१०:०० वाजता घरी ये, माझी झाली आहे तयारी”, असे ऐकून मी फोन ठेवला आणि आवरायला निघालो. सगळ आटपून, मी माझा तयार झालो, ब्याग-बिग भरली, पोटाची शांती केली, घरचा निरोप घेऊन मी गाडीला किक मारली आणि निघालो, थोडसे पुढे जाऊन उन्हाचा कडाका जाणवू लागला आणि त्यात जाणवलं उन्हाचा पारा भलताच चढला होता, ह्याचा इलाज म्हणून जाताना डोक्याला झाकेल असे रंगीत कापडी मफलर घेतले आणि एक लाल कचकडीचा चष्मा, जेणे करून डोळ्याला कवचकुंडकवाणी झाकेल, असा मनावर दगड ठेऊन १२०:०० रुपड्याचा खर्च केला, ते फ़क़्त आणि फ़क़्त हरिहर गडाच्या प्रेमाखातीर बऱ का..

पाटलांच्या घरून त्यांना उचललेले आणि निघालो, मग पाटलांचा मान राखून पुन्हा आम्ही पुन्हा मिसळ पाववर ताव मारला, तेथेच भेटून आम्ही पुडच्या मोहिमेची आखणी केली, मनाची तयारी करून आणि पोटाची भरणा करून आम्ही निघालो, सोबत मी, पाटील आणि माझी डार्लिंग ( अर्धागणी म्हणा कि जोडीदार, माझी बाई’क स्प्लेंडर+) असे आम्ही निघालो, आकुर्डीहून आम्ही तळवडे मार्गे चाकणला निघालो म्हणजे भोसरी-मोशीची ट्राफिक टाळून थेट चाकण पोहचलो, मग पुढे जाऊन गाडीचे पण पोट भरले, थोडक्यात आम्ही ओल सेट झालो होतो पुढच्या प्रवासाला, दुपारचे १२:०० च्या ठोक्याला आम्ही राजगुरुनगरला होतो तेथून तळपत्या उन्हाला डोक्यावर घेऊन आम्ही निघालो, राजगुरूनगरची गर्दी बाजूला सारत मी गाडी पुढे काढली, पुढचा घाट पण सहज चढलो आणि वरच्या पठाराला लागलो, म्हणजे पुणे पुरते सोडल्यागत झाले, काहीशा वेळात आम्ही मंचर पार करून पुढे नारायणगावात पोहचलो, इथे थोडासा रेस्ट घेऊन, घशाला जाणवणारा कोरड पण घालवण्यासाठी आम्ही नीराचे चांगले दोन ग्लास उतरवले गळयाखाली. थोडीशी विश्रांती करून आम्ही निघालो पुढच्या २०० kms च्या प्रवासाला, हायवेचे काम मस्तच चकाचक झाले होते #NH६० चे, रस्ता एवढा मोकळा आणि सुंदर होता कि ट्राफिकचा त्रास नाही आणि रस्ता जरा आपल्याच मालकीचा आहे ह्याची फिलिंग्स देत होता, आळेफाटा जवळ आलो आम्ही, आळेफाटा आणि माझ काय नात आहे काय जणू, पण इथे आले कि मनाशी साखर पाझरू लागते, गालावर मिश्कील हसू येते, मनामध्ये आनंदाचे हुंडके फुटू लागाटतात. असेच काहीतारी होत असते...

रस्ता मोकळा, उन्हाचा कडाका, हळूचशी जाणवणारी गार वार्याची झुळूक आणि समोर दिसणारा निमुळता लांबच लांब असा नवा कोरा करकरीत रस्ता, असे काहीतरी दृश्य डोळ्यासमोर येत होते गाडी चालवताना, रोडच्या शेवटच्या लेनने माझी गाडी चालवत निवांत अश्या ७० kms ह्या वेगाने चालवत होतो, काय करणार आमचं रोकेट एव्हड्याच ताशी वेगात चालू शकते म्हणजे अधिकतम वेग हं हिचा, तर मी आणि पाटील फ़क़्त दोघच मग गाडी चावताना कधी गप्पा तर कधी ईकडच्या तिकडच्या गोष्टी चालू होत्या, शांत बसू वाटल तर आम्ही शांत नाही तरी काहीतरी कुठल्या न कुठल्या विषयावर आमचे बोलणे चालू होते, आळेफाटा पास करून भरपूर वेळ झाला होता, मग थोड्या वेळाने आम्ही घाव्गाव पास केले, ह्या गावाची खासियत म्हणजे इथले साखरेचे कानडी पेढे, कधी आलात तर आवर्जून चव चाखा इथल्या पेढ्याची, पेढ्याचा मोह टाळत आम्ही तसच पुढे निघालो, नवीन हायवे हा पुढे नाशिक डोंगर पोखरून केला आहे ह्याचे दर्शन होऊ लागले होते सरळ सुता सारखा हायवे केला आहे पहिल्या सारखे घाट रस्त्याच पुरत नामुनिशाण गायब केले आहे, आधी मधी आम्ही थांबत आमचा प्रवास जिवंत ठेवत होतो , पुढे संगमनेर आणि मग सिन्नर पार करून आम्ही नाशिकात पोहचलो, पुढे शहरातून आम्ही त्रिंबककडे जाण्याऱ्या रोडला लागलो, त्रंबकेश्वरहून आम्ही हरिहर गडाकडे निघालो ते थेट कारण दिवस मावळती कडे पळू लागला होता, त्यामुळे आमची जरा गडबड वाढली, काही वेळात आम्ही गावात पोहचलो, गावात एका घरा समोर गाडी लावली, तिथल्या मामांशी जरा बोलणे केले आणि गडाला जाणार्या वाटेबद्दल विचारले, त्यांचे ऐकून आम्ही सरळ धावती वाट पकडत आम्ही गावाकडून प्रस्थान केले, वाट तशी सोपी होती, आणि सहज सापडणारी होती, काहीस वर जाऊन आम्ही अर्ध्यापर्यंत पोहचलो, तेथे मठात जाऊन आलो आणि वरती जाण्याची अजून माहिती घेतली, आता अंधार पूर्ण पडला होता, पण सोबत टोर्च आणल्याने त्याची मदत झाली, तसच वर जाणारी वाट पकडून आम्ही एका झोपडी पाशी आलो, आता गंमत अशी कि पुढे जाण्याची रिस्क घेणे जरा धोकादायक होते मग आम्ही तेथेच उभ्या काताळाच्या पुढ्यातच आम्ही आमचे घर ठोकले म्हणजे टेंट फ़िकस केला, रात्रीचे आता नऊ होत झालते मग आम्ही सर्व सेट करून निवांत झालो, टेंटच्या मागे उभा दगडी कातळ तो अंधारात भयानक दिसत होता, थंड वारा जरासा दरवळत होता, भयाण शांतता, आजूबाजूला दिसणारी दिवे बत्यांच्या चांदण्यांचे घोळके, लांब असलेला घाटातील जाण्याऱ्या गाड्यांचे चमकणारे दिवे, शुकशुकाट सगळी कडे, नाशिकच्या त्रंबकरांगेची रौद्र निद्रेत असलेली डोंगरांची रांग, आमच्या डाव्या उजव्या बाजूला गेलेली नुमुळती खोल दरी ती आता भयाण वाटत न्हवती कारण काळोखाने त्या दरीला गुडूप्त केले होते, असा रम्य नजराणा पेश आणि खेळता होता आमच्या डोळ्या समोर, आता आम्ही दोघच त्या पठारावर, मग निवांत बसून आम्ही गप्पा सुरु केल्या, दोघान मध्ये आता काय सवांद होणार पण विचारशक्तीच्या पण पलीकडे असते, पण मनाला एकांत भेटला कि तो अगदी सुसाट असतो, मग आमच्यात सुरु झाल्या जुन्या आठवणीच्या गप्पा, इथे मनाचे मनोरंजन वैगरे काही करायला आलो नव्हतो मी त्यामुळे मोबाईल जरा बाजूला ठेवला होता, त्यातली मुसिक प्लेअर ला मी रजेवर ठेऊन आलो होतो घरून निघताना, त्यामुळे असल काही शांतता भंग करणारी वस्तू आहेच नाही असे गृहीत धरून आम्ही आमच्या गप्पान मध्ये तल्लीन झालो होतो, बोलता बोलता मी जरा पाठीला जमिनीवर टेकवून पडी मारली, डोळे जराशे झाकले, मनातला काळोख माझा बंद डोळ्या समोर होता, कानांना स्वीच ऑफ केल्या गत शांत पडलो मी, आणि खरच निवांतपण काय तो आनंद अनुभवत होतो, बाकी काही नाही एवढच..

गप्पा रंगल्या आणि त्या चालूच होत्या, आज चंद्र ढगांच्या पल्याड लपला होता, दर्शन ते त्याचे अदृश्य झाले होते, पण काही खंत नाही कारण मागच्याच आठवड्यात कात्रज-सिह्गडच्या पोर्णिमा रात्रीला त्याला चांगलाच डोळ्यात भरून घेतला होता त्यामुळे इथे दिसत नाही याची खंत काही जाणवत न्हवती, जस जशी वेळ सरत होती तस तसे आकाश चांदण्यांच्या गर्दीने फुलत होते, माझा सारख्या अधाष्याला ह्या अश्या सुखाची खरी किंमत माहित, डोळ्यांना स्वर्ग सुख देत होते असा काहीसा अनुभव येत होता, पाठीला रुतनाऱ्या खड्यांनी थोडेसे असह्य केलते पण आभाळात लाखो तार्यांचे दर्शन मन मात्र मोहित करून टाकत होते, असा नाजराना बघणं अहोभाग्यच म्हणावं लागेल मला, हा नजराणा बघताना डोळे माझे तृप्त झाले होते, म्हणजे कसे आकाश चादान्यांनी भरले होते आणि खाली आम्ही अंधार्या डोंगरावर त्याचे चीत्रीफिती डोळ्यात रंगवत होतो. पोटाची भूक भागवन्या साठी आम्ही पुरेसे खादाड साहित्य तसे आणले होते त्यामुळे आम्ही निवांत होतो, मग हळू हळू ब्यागेतून एक एक खाऊ बाहेर निघत होता आणि थेट त्याचे पोटात स्वारी होत होती, गप्पा गोष्टी रंगल्या होत्या आमच्या, दोघचं आम्ही म्हटल्यावर मग कसला हि प्रकारचा त्रास न्हवता आम्हाला तेथे, मस्त उघडया पठारावर पाठ टेकवून वरच्या आकाश कॅनवासचा त्यातला तार्यांच्या खेळ डोळ्यात सामावून घेत माझे निवांत रवण चालू होते, मोबाईल हा कधीचाच नेटवर्क किचकटीतून मोकळा झाला होता त्यामुळे त्याला कुठल्याहि प्रकारचा कॉल ना मेसेज डिवचत होता आणि माझी एकांत वेळ त्यामुळे अजूनही सुखकर जाणवत होती, काही तासाभराचा वेळ आम्ही घालवला आणि झोपण्याची तयारीला लागलो, टेंट तसा आम्ही आधीच रोवला होता त्यामुळे फ़क़्त आत जाऊन ताणून द्यायचे होते, आणि तसे आम्ही थेट आत गेलो आणि टेंट ला आतून चैनबद्ध केले आणि वामकुशीत सामावून गेलो.

इथे आड ठिकाणी, पठारी देशात येऊन निवांत झोप येन जरा अवघडच आहे म्हणा, त्यामुळे डोळे झाकले तरी झोप काय ती येत न्हवती, आत मधे टोर्च चालू होता त्यमुले बाहेरण एक भुंगा चांगलाच तावला होता, नुकत बुंग बुंग करत झोपेचे खोबर करत होता, मधे मधे झोप लागत होती पण जाग येत होती तेव्हा बाहेर पाहिलं तेव्हा उजेड चांगलाच पडला होता ह्याची जाणीव होत होती, पण अजून सकाळ काय ती झाली नव्हती, पण उजेड तो कसला याच गूढ मला होते मग नंतर समजले कि चंद्राने आपले रूप पांढरे उजाडणे चालू ठेवले होते, पण अंगात माझा झोप चांगली माळली होती त्यामुळे बाहेर जाऊन बघन माझा उराशी आले होते मग तसेच झोपी गेलो आणि थेट सकाळच्या ६:०० च्या ठोक्याला उठलो आम्ही, तोंडावर पाणी शिंपडत आम्ही फ्रेश झालो, आणि मागे उभ्या कातळाकडे बघु लागलो, रात्रीचा भयाण दिसणारा हाच तो भयाण कडा जो काळोख्या राती भयाण डर दाखवत होता, आम्ही पुन्हा दिवसाची चढाई सुरु करण्यास सुरवात केलली आणि कातळाकडे प्रस्थान झालो थेट..

पायदळी मळलेली वाट पकडून आम्ही निघालो, उजवी कडे कडा बघत वर चढू लागलो, थोडीशी कसरत करत आम्ही कातळात कोरलेल्या पायर्यांकडे आलो, समोर ६०® अंशात उभ्या पायऱ्या, त्यांना त्रिवार मुजरा करत आम्ही वर सरसावलो, जस जसे वर जात होतो आम्ही तेव्हा मागे बघताना अंगात कापरं येत होती, मागे खोल भयाण दरीकडे बघणे धाडस होत नव्हते म्हणून तसेच पुढे वर चढत आम्ही निघालो, काहीशा ५० पायर्या इथे आम्ही चढलो, पुढे पहिल्या बुरुजाला जाऊन पोहचलो, त्या बुर्जाच्या प्रवेश द्वारास शेंदुराने मस्त रंगवले होते, तेथे जरा काही वेळची विश्रांती घेतली आणि मग पुन्हा पुढे निघालो, एक मोठ्या दगड डोंगराला पोकरले आहे ह्या गडाच्या बांधणीसाठी त्यामुळे इथे एक माणूस एकदा जाईल आणि वाकून जाता येइल अशी वाट होती, उजव्याबजूस दगडी कातळ आणि डावीकडे उघडी खिडकि, जास्त कडेला गेला कि मग गेलाच म्हणावं लागेल खाली, मग तस दबकं पाउल टाकत पुढे चालू लागलो आम्ही, पुढे पुन्हा कातळातील खोदलेल्या पायर्या, आता इथे कातळाच्या पोटातून गोलाकृतरित्या खोदलेल्या पायऱ्या दिसू लागल्या, जस जसं वर जाताना मागची बाजू म्हणजे खुल जंगल आता रोपट्यांचा कुंचा वाटू लागला होता आणि माझी होणारी हालत ती वेगळीच होती म्हणा, वरती पोहाचल्यावर गडाच्या सोनेरी स्वर्ग जगाचे दर्शन झाले एकदाचे, वरती गेल्यवर पहिल्यांदा भगव्याला वंदन केले, तसाच गड माथा फिरून घेतले, वरच्या बाजूस महदेवाची पिंड, मारुतीचे मंदिर, एक चौकोनाकृती दगडी एक खिडकी असलेली खोली दिसली, मग काहीसे परिसराचे दर्शन करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो ते तेथे खालच्या बाजूस असलेल्या मठात पोहचलो, तेथे जाऊन थंड पाण्याला अंगावरून घेतले आणि मस्त तयार झालो.

परतीचा प्रवास म्हणजे अंगावर येतो माझा, पण मागे फिरताना त्या महाकाय गडमाथ्याला वंदन करून निघालो, बाहेर फाट्यावर भुकेची आग पहिली मिटवायची असे ठरवले आणि ठेट नाक्यावरील हाटेलात पोहचलो आणि नेहमी प्रमाणे मिसळ-पाव ची फर्मायीश केली, माझ असे आहे कि जाऊ तेथे, त्या भागातील मिसळ चाखायची असे असते म्हणून म्हटलं आता इथली आता चाखूया...

खवळलेल्या जिभेला आणि सिमोलंघन करू पाहणाऱ्या पोटाला मी एकदाचे शांत केले आणि आम्ही निघालो, नाशिकात त्रंबकचे मुख दर्शन घेऊन बाहेर पडू लागलो, आतल्या रस्त्यावरून जाण्यापेक्षा आम्ही बाहेरील मार्ग शोधला ते आपले परमबंधू गुगल म्याप यांच्या मार्ग दर्शन खाली. नाशिक शहर मग सिन्नर मग संगमनेर मागे टाकत पुढे आलो, आता पुन्हा हायवेचे कौतुक नको म्हणून बोलत नाही, दुपारचे ३:०० वाजले पुन्हा पोटात आता कावळ्यांची जत्रा भरू लागली होती आता, तस आता मिसळने माझी भूक भागवणे आता मुश्कील होते त्यामुळे काही तरी तडखत-भडकत पाहिजे होत, आणि त्यासाठी हाटेलाची शोध शोध सुरु झाली आणि “मल्हार” हॉटेलात पोहचलो, मालवणी चिकन, नगण्य रोट्या, चिकन बिर्याणी आणि ढेकर फुटावी म्हणून एक कोला, असे काहीतरी मनाची शांती व्हावी म्हणून पोटाची भरणा केली आम्ही आणि निघालो निघालो घराच्या वाटेला......

#Harihargad_travel_Blog
#Travel_Story
#jeet
#blogger
#Dream
-----------
जितेंद्र वाजे
०७-०६-२०१७


No comments:

Post a Comment